आपल्याकडे लोककथा, लोकगीते ही मौखिक परंपरेतून आली त्यातुन, गोष्ट सांगणे या संकल्पनेचा उगम झाला आणि ही कथनशैली कथा-कादंबरी या साहित्य प्रकारात जोमाने रूजली आणि त्याचे विविधांगी अविष्कार समोर आले. कथा-कादंबर्यांवर आधारित नाटक, चित्रपट, दीर्घांक आले त्यातून अभिरूचीची नवी दृश्यभाषा तयार झाली. ती रसिकांना आपलीशी वाटली आविष्कारांचं हे नवे रूप ठरले. संगीत, नृत्य यांना स्वतंत्र भाषा आहे. चित्रपट, नाटक या कलेतून वास्तवाचे समकालाचे प्रश्न तीव्रपणे मांडता येतात आणि रसिकांकडून त्याला प्रतिसाद तात्काळ मिळतो.
राजू देसले (लेखक कवी आहेत)
प्रत्येक कलाकृतीतुन कलावंताला काहीतरी सांगायचं असतं त्याच हे म्हणणं कधी धूसर असतं तर कधी स्पष्ट असतं हे सांगण्यासाठी कलाक्षेत्राच्या जाणीवांचं सजग भान त्याला असावं लागतं त्यालाच लौकीक अर्थाने आपण प्रतिभावंत म्हणतो. कलेमध्ये विचार कशाप्रकारे व्हायला पाहिजे यासाठी काळाशी कलेची सांगड घालणे महत्वाचे असते.
सिनेमा नाटक बघतांना, संगीताची मैफल ऐकतांना मन एका वेगळ्या विश्वात जाते, भावव्याकुळतेचा हा अनुभव असतो. सिनेमा बघतांना अनेक गोष्टी विनाकारण खर्या वाटतात नाटक आपल्या भावनांशी नातं जोडतं. संगीत ऐकतांना मनाची स्थिर अवस्था होते. चैतन्यदायी, समाधिस्थ अनुभव येतो ‘मन’ कलाकृतीला प्रतिसाद म्हणून वेगवेगळ्या अवस्थापर्यंत पोहोचते. बड़े गुलाम अली खाँं, बेगम अख्तर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, पं. रवीशंकर, हरिप्रसाद चौरसीया, शिवकुमार शर्मा, परवीन सुलताना, झाकीर हुसेन अशा अनेक कलाकारांच्या सांगितीक अविष्कारातून अनुभूतीचा प्रत्यय रसिकांला येतो. दिलीप चित्रे, अरूण कोलटकर, आरती प्रभू नामदेव ढसाळ यांच्या कविता, भालचंद्र नेमाडेंचे कोसला, हिंदु. कमल देसाई, भाऊ पाध्येंच्या कथा, किरण नगरकरांच्या कादंबर्या, दि.बा. मोकाशी, माधव आचवल, विजय तेंडूलकर, रंगनाथ पठारे यांचे लेखन अभिरूचीचा प्रत्येक वेळी नवनवा अनुभव देते.
कविता वाचनातून कवितेचे भावसौंदर्य आशयाचं भिडणं येतं. नाटकासारख्या परफॉर्मिंग ‘आर्टमधून’ अभिनय आणि शब्द माध्यमाचा अविष्कार समोर येतो. भाषेवरचे, प्रभुत्व, शब्दफेक, भाषेचा बाज यांची जाणीव प्रकर्षाने रसिकाला येते. प्रत्येक साहित्य प्रकाराचं हे वेगळेपण निर्मिती सोबतच येतं. कथा, कादंबरी वाचतांना वाचक आपली प्रतिमासृष्टी निर्माण करत असतो आणि त्यातून अभिरूचीचं एक विश्व निर्माण करत असतो. ह.ना. आपटेंच्या कादंबर्यात काळ आणि त्यातील पात्रे यांचा संदर्भ त्या काळाशी जास्त निगडीत आहे. त्या त्या काळाचे संदर्भ कलाकृतीला, साहित्यकृतीला असतात आणि ती काळाची अभिरूची असते. त्या अभिरूचीला नव्या जाणिवेतून बघणे, अविष्काररूप देणे म्हणजे ‘माध्यमांतर’ होय.
कविता व सिनेमाचा संबंध काय, नाटकावर आधारीत सिनेमाच्या अविष्कारात काय वेगळेपण असते, चित्रकार ऑपेरासाठी पडदे रंगवतांना कसा विचार करतात? असा कला व्यवहाराविषयी आंतरशाखीय अभ्यास मराठीत तसा कमीच आहे.
कादंबरीवर सिनेमा करतांना त्यातील सर्वच पात्रे सिनेमात आणता येत नाही. त्यासाठी एक सुत्र घेऊन सिनेमा निर्माण करावा लागतो. यशस्वी कलाकृती निर्मितीसाठी लेखक व दिग्दर्शकाची संवेदनशीलता जर समांतर असेल तर दृश्यभाषा परिणामकारकपणे पडद्यावर येते.
मेरे नौकर की कमीज या विनोद कुमार शुक्ल यांच्या कादंबरीत रोजच्या जीवनातील घटनांवर भाष्य आहे. तोच-तोचपणा आयुष्यात वाट्याला येतो. त्यावर टिप्पणी आहे. यातला नायक घरी येण्याच्या आनंदासाठी बाहेर जात राहिले पाहिजे. हा सहज सोपा विचार मांडतो. प्रत्येकाला कळलेलं जगणं इथे येते. दिग्दर्शक मणी कौल यांनी अतिशय कमी फ्रेममध्ये हे पडद्यावर मांडले आहे. प्रतिमांच्या वेगळ्या भाषेचा आयाम इथे येतो. म्हणून टिपीकल सिनेमापेक्षा हा सिनेमा वेगळा ठरतो.
गॉडफादर या कादंबरीवर लेखक मारीओ पुझो याच कादंबरीवर चित्रपटासाठीही जेव्हा लेखन करतो. त्यावेळी कादंबरीतल्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. त्या-त्या माध्यमाची उपजत बलस्थाने असतात. जसं सिनेमाला नाटय लागतं. दृश्य माध्यमात स्पेस (अवकाश) ही संकल्पना कलाकृतीच्या अर्थवहनासाठी पुरक म्हणून काम करते.
कुठलीही कलाकृती ही मानवी जगण्याशी थेट नाते जोडते. तिचे जटीलपण, उलगडण्याचे काम थोड्या बहुत फरकाने आपण सारे करतो. तळहातावरच्या चतकोर चंद्राइतके.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह
गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
चित्रपट, नाटक आणि कादंबरी किंवा कथा ह्या माध्यमातून, नृत्य व संगीत सुद्धा, कलासक्त अनुभव देता आणि घेता येतो हे निर्विवाद आहे! संवाद ही ह्या कलांची प्राथमिक गरज आहे! राजू देसले हे खूप चांगल्या प्रकारे हे प्रतिपादन करतात!????
राजू देसले हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.थोडे पण अभिजात असे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य.म्हणावे लागेल.खूप सुंदर लिहिले आहे.
चित्रपट, नाटक आणि कादंबरी किंवा कथा ह्या माध्यमातून, नृत्य व संगीत सुद्धा, कलासक्त अनुभव देता आणि घेता येतो हे निर्विवाद आहे! संवाद ही ह्या कलांची प्राथमिक गरज आहे! राजू देसले हे खूप चांगल्या प्रकारे हे प्रतिपादन करतात!????