नांदगाव- नदीपात्रालगत वास्तव्य करणाऱ्या येथील वडाळकर वस्तीतल्या आदिवासींनी महसूल विभागाने सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करावे या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार उदय कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात दिला असून दखल घेण्यासाठी हे उपोषण प्रजासत्ताक दिनीही सुरूच ठेवण्याचा निर्धारही या निवेदनात व्यक्त केला. रिपाईचे शहराध्यक्ष (महावीर उर्फ नाना ) जाधव यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींच्या शिष्टमंडळाने तहसीलदार उदय कुलकर्णी यांची भेट घेत आपली कैफियत या निवेदनाद्वारे मांडली आहे. शहरालगत असलेल्या शाखांबरी नदीपात्रालगत आदिवासींची वडाळकर वस्ती असून नदीला मधून येणाऱ्या पुरामुळे अनेकांची घरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भविष्यातही हाच धोका कायम आहे शिवाय या वस्तीसमोर नगर पालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचा डेपो असल्यामुळे वेगवेगळ्या साथींच्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार या जनतेने यापूर्वी केली आहे. वर्षानुवर्षे वास्तव्याला असलेल्या आदिवासींना शासनाच्या घरकुल योजनेतून घरे मिळावीत व जवळच असलेल्या शासनाच्या महसूल विभागाच्या भूखंडावर सुरक्षित पुर्नवसन व्हावे अशी उपोषणकर्त्या आदिवासींची प्रमुख मागणी आहे. निवेदनावर अलकाबाई चव्हाण सुरेश गायकवाड सदा माळी,शंकर गुमडे दामू चव्हाण शांताबाई मोरे अक्काबाई सोनवणे एकनाथ सोनवणे सुरेश चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. २५ जानेवारीला उपोषण करणार असून ते दुसऱ्या दिवशी सुरूच ठेवण्याचा मनोदय या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.