नाशिक– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाट्यगृहे बंद ठेवण्यात आले आहेत. नाटक सादर करता येत नसल्यामुळे संपूर्ण नाट्यक्षेत्राला याची झळ सोसावी लागत आहे. मात्र, नाशिकच्या प्रथमेश जाधव या रंगकर्मीने घराच्या गच्चीवर खुला रंगमंच साकारला. आजवर १५ यशस्वी प्रयोग येथे झाले आहे. प्रायोगिक कलाकारांसोबत आता व्यावसायिक रंगकर्मी देखील खुल्या रंगमंचाच्या प्रेमात पडले आहे. ‘हिंदू नॅशनल थिएटर’तर्फे खुला रंगमंच महोत्त्सव सध्या सुरु आहे. १ नोव्हेंबर (काल) महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले गेले.
‘पुरुक्रमा’ चे सादरीकरण पुरुषोत्तम बेर्डे यांनी नाट्य व चित्रपट सृष्टी भोवती आजवर केलेली परिक्रमा व त्याबाबतच्या आठवणी, गमती जमती, अनुभव असा खजिना त्यांनी उलगडला. २८ वर्षाच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर त्यांनी नाट्य व चित्रपट सृष्टीत कसा बेखुबीने वापर केला हा प्रवास एकून व स्क्रीनवर त्याबाबतची चलचित्रे यावेळी दाखवण्यात आले. पुरुषोत्तम बेर्डे यांनी ही परिक्रमा अतिशय रंगदार रितीने रसिकांच्या पुढ्यात ठेवत रसिकांची भरभरून दाद मिळवली.
पहिल्यांदाच नाशिककर रसिकांनी हे सगळे गच्चीवरून अनुभवले. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते खुल्या रंगमंचाचे लाल फित कापून उद्घाटन झाले नंतर समस्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम बेर्डे यांनी कोरोना काळात पहिल्यांदा मुंबई बाहेर पडून नाटक सादर करण्याची हिंमत केली, कारण महाराष्ट्रात प्रथमच गच्चीवर नाटक उभे केले. यावेळी अभिनेता दिपक करंजीकर, विद्या करंजीकर, प्रशांत हिरे, मंगेश बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.