येवला – कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असतांना पुन्हा नव्याने रुग्ण वाढत आहे हा चिंतेचा विषय असून रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी शहर व तालुक्यात पुन्हा सर्व्हे करण्यात येऊन कोमॉर्बीड रुग्णांचा नव्याने शोध घेऊन औषधे उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज येवला शासकीय विश्रामगृह येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला व निफाड तालुक्याची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची संख्या कमी पडणार नाही यासाठी अधिक बेडची व्यवस्था करण्यात यावी त्यादृष्टीने येवला उपजिल्हा रुग्णालयाचे तातडीने करण्यात यावे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या कारणांचा सखोल अभ्यास करून मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
खड्डे तातडीने बुजवा
भुजबळ पुढे म्हणाले की, कोरोनाच्या उपचारासाठी नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची नियमित माहिती संकलित करण्यात यावी. रुग्णांच्या इतर आजारांबाबत अधिक माहिती ठेऊन त्यावर लवकरात लवकर उपचार करण्यात यावा अशा सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी चौकशीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यात यावे असे आवाहन केले. तसेच तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था बघता रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येऊन खड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. यावेळी शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज, गणेशोत्सव याबाबत आढावा घेतला.
यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,सार्वजनिक बांधकाम विभागावर उपअभियंता देवरे, महावितरणचे कार्यकारी राजाराम अभियंता, उपअभियंता प्रजापती, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख,संदीप कराड, सहायक निबंधक एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे आदी उपस्थित होते.
होळकर घाटाची पाहणी
येवला शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहारा लगत असलेल्या अंगणगाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाटाची पाहणी केली. यावेळी विसर्जनाच्या दृष्टीने घाटाची स्वच्छता करणे, विसर्जन करतांना गर्दी होणार नाही, तसेच डिटन्सचे पालन करण्यात यावे याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.