मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तीन आठवड्याचा कडक लॅाकडाऊन लागण्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिले आहे. अगोदरच राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधाला सर्वत्र विरोध होत असतांना त्यांनी कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॅाकडाऊन आवश्यक असल्याचे सांगितले.
या लॅाकडाऊन बाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मी मांडला आहे. येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल असेही ते म्हणाले. वडेट्टीवार म्हणाले. तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी अशी मागणीही केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.