पुद्दुचेरी – काँग्रेस-द्रमुक सरकारला बहुमत सिद्ध करता न आल्यानं सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नायब राज्यपालांना आपला राजीनामा सोपवला आहे. या सर्व राजकीय खेळात नायब राज्यपाल पदावरून किरण बेदी यांना हटवून त्याचा काँग्रेसला फायदा मिळू नये अशी व्यवस्था मोदी सरकारनं केली. यातून भाजपची रणनीती यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे.
राज्यातल्या चार आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेसचं सरकार अल्पमतात आलं होतं. किरण बेदी यांनीच हे घडवून आणलं, अशी टीका काँग्रेस करत होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला सहानुभूती मिळून फायदा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे बेदी यांना हटवून गृहमंत्री अमित शाह यांनी खेळी केली.
किरण बेदी पदावर नसल्यानं काँग्रेसला सहानुभूती मिळणं कठीण होईल. निवडणुका असल्यानं राहुल गांधी यांनी तिथल्या नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. त्यांचे विश्वासू नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडे पुद्दुचेरीची जबाबदारी सोपवली. राहुल गांधी बुधवारी पुद्दुचेरीच्या दौर्यावर असल्यानं त्याच्या एक दिवसाआधीच बेदी यांना पदावरू हटवण्यात आलं.
सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत किरण बेदी यांना पदावरू हटवण्याची मागणी मुख्यमंत्री नारायणसामी यांनी केली होती. भाजपनं पुदुदचेरी निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि राजीव चंद्रशेखर यांची नेमणूक केली. त्यांच्यामार्फतच पुद्दुचेरी ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.