पुद्दुचेरी – विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणीच्यापूर्वीच सत्ताधारी काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या के. के. लक्ष्मीणारायण आणि द्रमुकच्या के. वेंकटेशन यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे सत्ताधारी समर्थक आमदारांची संख्या ११ झाली आहे. तर विरोधी पक्षाकडे १४ आमदार आहेत. ३३ सदस्यांच्या विधानसभेत आता ७ जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे के. नारायणसामी यांच्या सरकारसमोरील संकट अधिक गडद झालं आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा
लक्ष्मीनारायणन आणि वेंकटेश यांनी सांगितलं की, त्यांनी विधानसभा अध्यक्ष वी. पी. शिवकोलुंधू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
लक्ष्मीनारायणन यांनी वार्ताहरांना सांगितलं, की नारायणसामी सरकारकडे बहुमत नाही. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचासुद्धा राजीनामा दिल्याचं सांगितलं. वेंकटेशन म्हणाले, की त्यांनी केवळ आमदारकीचा राजीनामा दिला असून, द्रमुकमध्ये ते कायम राहणार आहे.
एक आमदार अपात्र
आमदारांना त्यांचा स्थानिक विकास निधी मिळत नसल्याने आपापल्या भागात नागरिकांच्या गरजा पूर्ण करून शकत नव्हते, असं वेंकटेशन यांनी सांगितलं. काँग्रेसच्या चार आमदारांनी नुकताच राजीनामा दिला होता. त्यामध्ये माजी मंत्री ए, नमस्सिवम (आता भाजपमध्ये दाखल) आणि एम. कृष्णाराव यांचाही समावेश आहे. तर एका आमदाराला अपात्र ठरवण्यात आलं आहे. नारायणसामी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ए. जॉन कुमार यांनीसुद्धा या आठवड्यात राजीनामा दिला होता.
बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश
तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांनी गुरुवारी पुद्दुचेरीचे नायब राज्यपालाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी नारायणसामी यांना २२ फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.
आमदारांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत पआमदारांना पुढील रणनीती बनवायची होती. १८ फेब्रुवारीलासुद्धा एक बैठक झाली होती, मात्र त्यात कोणताही निर्णय झाला नव्हता.