चेन्नई – विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस सरकारच्या गच्छंतीमुळे भाजपला लाभ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच तामिळनाडूतही या परिस्थितीचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजप विशिष्ट खेळी खेळण्याची चिन्हे आहेत.
पुद्दुचेरीच्या राजकारणावर तामिळनाडूचा मोठा प्रभाव आहे. विशेषतः द्रमुक व अण्णाद्रमुकचा. पुद्दुचेरीतील घडामोडींमुळे द्रमुक–काँग्रेस आघाडीला धक्का बसला आहे, तर अण्णाद्रमुक–भाजप युतीला दिलासा मिळाला आहे.
सध्यातरी पुद्दुचेरीतील राजकीय परिस्थितीमुळे त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता आहे. अश्यात तेथील उपराज्यपालपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सुंदरराजन मुळच्या तामिळनाडूच्या असून त्यांनी जनतेशी थेट संवाद साधल्यास भाजपला फायदाच होणार आहे. सोबतच तामिळनाडूलाही एक संदेश पोहोचेल.
भाजपच्या एका प्रमुख नेत्याचे म्हणणे आहे की, पुद्दुचेरीपेक्षा तामिळनाडू सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. पुद्दुचेरीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि द्रमुक यांची आघाडी आपले सरकार वाचविण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे तामिळनाडूतही या आघाडीबद्दल लोकांमध्ये अविश्वास निर्माण होईल.
दुसऱ्या बाजुला सरकारविरोधी वातावरणाचा सामना करणाऱ्या अण्णाद्रमुकला याचा फायदा होईल, कारण भाजपही त्यांच्या आघाडीत सामील आहे. दोन्ही पक्षांना आता विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
तामिळनाडूच्या निवडणुका यंदा द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांच्या नव्या नेतृत्वांमध्ये होत आहेत. अश्यात जनतेचा कल लक्षात घेणे अत्यंत अवघड ठरेल. भाजप मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, केंद्राची योजना आणि अण्णाद्रमुकसोबतच्या आघाडीवरील समीकरणांवर अवलंबून आहे.
सरकारविरोधी वातावरण असल्यामुळे तामिळनाडूत अण्णाद्रमुकसोबत राहणे फायद्याचे ठरणार नाही, असेही काही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. पण त्याचवेळी काँग्रेस–द्रमुक आघाडीवरही जनता फारशी खुश नाही, असेही ते म्हणतात.