पुणे – भाजपचे खासदार उदयनराजे यांच्या पुढाकाराने येथे आयोजित करण्यात आलेली मराठा आरक्षण परिषद अखेर रद्द करण्यात आली आहे. येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये ही परिषद दुपारी २ वाजता होणार होती. त्यात वकील, विविध क्षेत्रातील मान्यवर, याचिकाकर्ते आदी उपस्थित राहणार होते. मराठा आरक्षणाबाबत विचारविनिमय करुन पुढील दिशा ठरविली जाणार होती. त्यामुळे या परिषदेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. नक्की कुठल्या कारणामुळे ही परिषद रद्द करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, खासदार उदयनराजे यांनी ही मान्यवर व्यक्तींना निरोप पाठविला आहे. त्यात ही परिषद रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसे वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.