नवी दिल्ली/पुणे – कोरोना साथीच्या विरोधात सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धामध्ये पुण्याचे भारतीय लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रत्येक कार्याकडे जगाचे लक्ष आहे. येथे ‘मिशन कोव्हिशिल्ड’ राबविले जात आहे.
जगातील सर्वात मोठ्या लसी उत्पादक कंपनीने कोविड -१९ ही लस भारतासह जगातील सर्व देशांना, विशेषत: गरीब आफ्रिकन देशांना पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने जगातील विविध भागात एकूण २० हजार लोकांवर केलेल्या चाचणीत ही लस ७०.४ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. तर दोन डोस पूर्ण झाल्यावर ९० टक्के वेळपर्यंत ही लस प्रभावी ठरणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
सीरमने नमूद केले की, ही कंपनी लवकर टप्प्यासाठी लसीकरणासाठी १०० दशलक्ष डोस मंजूर होताच प्रदान करेल. सध्या पाच कोटी डोस आधीच तयार आहेत, परवानगी दिल्यास उत्पादन वेगवान केले जाईल. सीईओ अदार पूनावाला यांनी म्हटले आहे की, ही लस किती प्रभावी आहे हे केवळ वेळच सांगेल, परंतु आतापर्यंतच्या चाचणीमुळे ती प्रभावी आहे आणि असंख्य लोकांचे जीवन वाचवेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
सीरमने तयार केलेली तयारी आणि त्यात जगाने व्यक्त केलेला विश्वास भारताचा अभिमान वाढवणार आहे. मोठी गोष्ट म्हणजे ही लस सामान्य रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. त्यासाठी उणे ७० अंश सेल्सिअस तपमान किंवा कोल्ड स्टोरेजची आवश्यकता नाही. २०२१ च्या अखेरीस ही भारतीय कंपनी कोविड -१९ ही लस अर्ध्या जगाला उपलब्ध करुन देईल.
कोरोना लसीलाठी बिल आणि मिलिंडा गेटस फाऊंडेशनने सिरम इन्स्टिट्यूटला ३०० अब्ज डॉलर (जवळपास २२.५ अब्ज रुपये) एवढा निधी दिला आहे. तसेच, इन्स्टिट्यूटने २५० दशलक्ष डॉलर (जवळपास १८.५ अब्ज रुपये) खर्च करीत आहे. इन्स्टिट्यूटने या लसीच्या निर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्याची शिस्तबद्ध पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच निश्चित उद्दीष्ट गाठणे इन्स्टिट्यूटला शक्य होणार आहे.