कोविडविरोधी लस बनविण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची संधी
नवी दिल्ली – पुणे येथील सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाला कोविडविरोधी लस बनविण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी औषध नियंत्रकांनी परवानगी दिली आहे. सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडिया ही आँक्सफर्ड विद्यापीठ-अँस्ट्रा झेनेका सोबत देशात कोविड विरोधी लस बनवित आहे. या परवानगीमुळे कोविड विरोधी लस बनविण्याच्या कार्याला वेग येईल.
कोविड-१९ बाबतच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या सूचनांवर आधारित सखोल विश्लेषणानंतर डीसीजीआयचे डॉ व्ही जी सोमाणी यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी परवानगी दिली, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्या सध्या इंग्लंडमधे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात, ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यात तर दक्षिण आफ्रिकेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरु आहेत.
भारताच्या रुग्ण मृत्यू दरात आणखी घट झाली असून जगाच्या तुलनेत हा दर सर्वात कमी आहे. आज तो २.११ टक्के इतका झाला आहे. कोविड व्यवस्थापनाच्या ‘टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट’ या उत्तम आणि परीणामकारक कार्यवाहीमुळे देशात हा दर गाठणे शक्य झाले आहे. कोविड व्यवस्थापनाच्या धोरणाचे लक्ष्य त्वरित शोध, विलगीकरण,आणि रुग्णांचे सुरळीत व्यवस्थापन आणि अधिक धोकादायक लोकसंख्येच्या विभागात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा यामुळे देशात रुग्ण बरे होण्याच्या दरातील वाढ शक्य झाली आहे. गेल्या २४ तासात ४० हजार ५७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या ११ लाख ८६ हजार २०३ इतकी झाली असून बरे होण्याचा दर ६५.७७ % इतका झाला आहे. दरदिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि प्रत्यक्ष रुग्ण यातील फरक ६ लाखांपेक्षा जास्त झाला आहे. सध्या तो ६ लाख ६ हजार ८४६ इतका आहे. सध्या ५ लाख ७९ हजार ३५७ एवढे रुग्ण उपचाराधिन आहेत.