नाशिक – दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील प्रस्तावित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरच सुरु होणार असून याबाबत ग्रामस्थ आणि प्रशासन यांमध्ये असलेले गैरसमज दूर झालेले आहेत. येत्या दीड महिन्यात उपकेंद्राचे काम सुरु होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
नाशिक येथे प्रस्तावित पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी आणि त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ.प्रशांत टोपे, अहमदनगर उपकेंद्राचे समन्वयक डॉ. नंदकुमार सोमवंशी, प्रांताधिकारी संदीप आहेर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपकेंद्रसंदर्भात घोषणा केली होती. मात्र, कोरोनाची परिस्थिती उद्भवल्याने या प्रक्रियेला विलंब झाला आहे. आता वेगाने हे उपकेंद्र सुरु होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शासनामार्फत विद्यापीठाच्या ताब्यात देण्यात आलेल्या सुमारे ४० एकर जमीन क्षेत्राला संरक्षण भित बांधण्यात यावी. या भिंतींचे बांधकाम करतांना ग्रामस्थांना वहिवाटीसाठी १५ फूट रस्ता कुंपणाच्या बाजूने सोडण्यात येवून ग्रामस्थांची वाहतूकीच्या दृष्टिने गैरसोय होणार नाही, यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे निर्विवाद असणाऱ्या जागेवर प्रथम बांधकाम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन व नाशिक महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या वेळेत घेण्यात येवून सुरवातील दहा हजार चौरस फुटांच्या बांधकामास सुरुवात करण्याच्या सुचना मंत्री श्री. सामंत यांनी दिल्या आहेत.
पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राअंतर्गत स्थानिक उद्योगांना पूरक असणारे म्हणजेच नाशिक येथील वायनरी तसेच पैठणी व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच शिवनई येथील ग्रामस्थांच्या कौशल्य विकासासाठी काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रम विशेषत्वाने सुरू करण्यात येतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.