मुंबई/नाशिक- पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाबत शुक्रवारी (२२ जानेवारी) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. सामंत हे उपकेंद्राच्या शिवनाई येथील जागेलाही भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर व अन्य वरिष्ठ पदाधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे उपसचिव व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अहमदनगर उपकेंद्राच्या कामकाजाचाही आढावा घेतला जाणार आहे.
मुक्त विद्यापीठाचाही आढावा
नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विस्तार, विकास आणि कामाकाजाचा आढावाही मंत्री उदय सामंत घेणार आहेत. ही आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातच दुपारी ३ वाजता होणार आहे. या बैठकीसही कुलगुरु ई वायूनंदन यांच्यासह अन्य पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.