मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आता लसीचे आगमन झाले असले, आणि ब्रिटनमध्ये लसीकरण सुरु झाले असले तरीसुद्धा कोरोना प्रतिबंध आणि नियम यांच्यापासून तत्त्काळ सुटका होणे सध्यातरी शक्य नाही. लसीकरण झाल्यानंतर सुद्धा मास्क लावणे सुरूच ठेवावे लागणार असल्याचे ब्रिटनच्या शासनाचेसुद्धा म्हणणे आहे. ब्रिटन च्या बोरिस जॉन्सन सरकार द्वारे लसीकरण सुरु करणे ही आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी असल्याचे सांगण्यात येत असले तरी सुद्धा लोकांनी सावधगिरी सोडून देऊ नये, असे निवेदनही करण्यात येत आहे.
ब्रिटनच्या सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार असलेले पॅट्रीक वॉलेस सांगतात की लसीकरणाबरोबरच लोक जर नियमांचे पालन करतील तर अधिक फायदे होतील. सध्यातरी सगळे नियम आणि प्रतिबंध हे सुरूच राहतील कारण त्याशिवाय दुसरा कोणता उपाय नाहीये. याआधी पॅट्रीक वॉलेस यांनी असे प्रतिपादन केले होते की कोरोना व्हायरस हा लसीकरणाने जाणारा आजार नसून याची फ्ल्यू प्रमाणे दरवर्षी नवीन लाट येतच राहील. त्यांनी असेही सांगितले होते की लसीकरणामुळे संक्रमणाचा वेग मंदावेल आणि व्हायरस मुळे होणारे रोग कमी होतील.
ब्रिटन च्या सरकारने एक महिना लॉकडाउन लावल्या नंतर आता लोकांना काही प्रतीबंधापासून थोडी मुक्तता दिली आहे. मात्र ख्रिसमस जवळ असल्यामुळे बाजारपेठेत खूप गर्दी होते आहे. शासना द्वारे लोकांना अश्या प्रकारे खरेदीसाठी गर्दी करणे टाळण्यासाठी’ आवाहन केले जात असले तरीही लोक मात्र सामाजिक अंतर इत्यादी नियम पाळताना दिसत नाहीत.
रशियामध्ये सुद्धा लसीकरण सुरु झाल्यानंतरसुद्धा नियामानातून कोणतीही सुट दिली गेलेली नाही. रशियाचे दुसरे सर्वांत मोठे शहर असलेले सेंट पीट्सबर्ग तर ३० डिसेंबरपासूनच बंद केले जाणार आहे. शहरातील रेस्तराँ, कॅफे, आणि बार ३० डिसेंबर ते ३ जानेवारी पर्यंत बंद असतील, संग्रहालय, नाट्यगृहे, कॉन्सर्ट हॉल्स हे ३० डिसेंबर ते १० जानेवारी बंद असतील. अगदी त्या आधी सुध्दा रेस्तराँ, कॅफे, आणि बार हे सायंकाळी सात वाजता बंद केले जातील.
जर्मनी आणि इटली यांनी देखील प्रतिबंध अधिक कडक करण्याचे नियोजन केले आहे.