येवला – तालुक्यात मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या मका, बाजरी, मुग, सोयाबीन आदी पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभीमानी रिपब्लिकन पक्षाने एका प्रसिध्दीपत्राद्वारे केली आहे.
समाधानकारक पावसाने खरीप हंगामातील पिके जोमात होती. मात्र, शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला जात आहे. मूगास शेंगा लागल्या असतांना व बाजरी, मका पिकांच्या कणसात दाणे भरण्यास सुरूवात झाली असतांना अकस्मात झालेल्या मुसळधार पावसाने मका, बाजरी, मूग, सोयाबीन आदी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मका, बाजरी पिक भुईसपाट झाले आहे. नैसर्गीक अपत्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देवून दिलासा द्यावा, अशी मागणी सदर पत्रकात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप, विजय घोडराव, महेंद्र पगारे, नवनाथ पगारे, आकाश घोडेराव आदींनी केली आहे.