नाशिक – पीक कर्जाचे वाटप अधिक गतीने होण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली पीक कर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेतल्या जाणार आहेत. या बैठकीस तालुक्याचे उप सहाय्यक निबंधक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी, तालुकास्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, राष्ट्रीयकृत बँकांचे मॅनेजर तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांचे गटसचिव यांना उपस्थित राहणार आहेत. तशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय बँकर्स समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दु शेखर, राष्ट्रीयकृत बँक , खासगी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँकांचे विभाग स्तरावरील व्यवस्थापक ( झोनल मॅनेजर ), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. विविध सहकारी संस्था आणि बँकांचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम भरून पुढील कर्जासाठी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेकडे मागणी नोंदवावी. तसेच हे वाढीव कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.
यादी उपलब्ध करुन द्या
जिल्हाधिकारी म्हणाले की, मागील वर्षी सन २०१९-२० या वर्षात ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप केलेले आहे अशा शेतकऱ्यांची यादी वाढीव कर्जासाठी तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी, व्यापारी बँकांना गटसचिवांनी उपलब्ध करुन देण्यात यावी. ज्या राष्ट्रीयकृत बँका , खासगी, व्यापारी बँका यांनी खरीप पीककर्ज वाटप अत्यंत कमी प्रमाणात केलेले आहे त्यांना नोटीस देवून खुलासा मागवा, अशी सूचना मांढरे यांनी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दु शेखर यांना केली.
१ हजार २०९ कोटींचे कर्ज वाटप
आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात ३९ हजार ५९९ शेतकऱ्यांना १ हजार २०९ कोटी रुपयांचे इतके खरीप पीक कर्ज वाटप झाले आहे. तसेच या कर्जवाटपात पुढील आठवड्यापर्यंत ३०० कोटी पर्यंतचे कर्ज जिल्ह्यात वाटप करावे अशा सूचना सर्व बँकर्सला देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.