नाशिक – अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६३९ कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी १५६ कोटी जास्त कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. इगतपुरी व जिल्ह्याचा पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांची मागणी उशिराने होत असल्याने उर्वरित पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले की, १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीपेक्षा आज झालेल्या बैठकीत २०० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे अधिक वाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. ३ हजार ३०३ कोटी कर्जाच्या उद्दिष्टापैकी २ हजार ४०० कोटी कर्जाचे वाटप १० बँकांकडे आहे. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत बँक ऑफ महाराष्ट्राने २७१ कोटीचे वाटप केले होते, आजपर्यंत ते ३१८ कोटी पर्यंत करण्यात आले आहे. याचप्रमाणे आजपर्यंत एनडीसीसी बँकेने २७० कोटी, बँक ऑफ बडोदा २६३ कोटी, बँक ऑफ इंडिया ६६ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया ११२ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया २६५ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ७४ कोटी तसेच एचडीएफसी ३ कोटी व कोटक महिंद्रा ६ कोटी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या तुलनेत १५६ कोटी रुपयांची वाढ पीककर्ज वाटपात झाली असून गेल्या १० ते १२ दिवसात शेतकऱ्यांना साधारण अडीशे ते तीनशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
१७६ कोटींचे कर्ज वाटप
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या मध्यावधीत १ हजार २६७ कोटी प्राप्त उद्दिष्टापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना १७६ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी एनडीसीसी बँकेने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उशिराने रक्कम मिळाली असूनही जिल्ह्यात ३४ टक्के इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण लक्षांकापर्यंत जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बँकांनी पीककर्ज वाटपासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.