नांदगाव – पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे निदर्शनास येत आहे. तालुक्यातील वेहेळगाव येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखे समोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पीक पेरणी होऊन एक ते दीड महिना झाला तरी पीक कर्ज मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचे सांगितले जात आहे. पीक कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंचायत समितीचे गट नेते सुभाष कुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेहेळगाव शाखे समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत पीक कर्ज दिले जात नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
बँकेने गेल्या काही वर्षांपासून जेवढे पीक कर्ज दिले आहे. तेवढेही बँकेने उपलब्ध करुन द्यायला हवे. सध्या तसे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची हेळसांड सुरू आहे. याची दखल जिल्हाधिकारी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी
– सुभाष कुटे, गट नेते, पंचायत समिती, नांदगाव