नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत कोट्यावधी अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात २३२६ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. काही आयकर भरणारे मोठे शेतकरीही या योजनेत अपात्र असताना लाभ घेत असल्याने राज्य सरकार अशा लोकांना शोधून काढत त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत आहेत.
कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी संसदेत सांगितले की, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकर्यांना मदत करते. त्याअंतर्गत सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग केले जातात. विविध अधिकारी तपासणी करून त्यातील त्रुटी दूर केल्या जातात. मात्र, पडताळणी प्रक्रियेदरम्यान २३२६ कोटी रुपये हे सुमारे ३२ लाख ९१ हजार अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघड झाले. अशा काही घटना राज्यांकडून देखील नोंदविण्यात आल्या असून त्यानुसार अपात्र शेतकऱ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेचा गैरवापर केला गेला. काही राज्य सरकार अपात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करीत आहेत. तमिळनाडूत या योजने अंतर्गत सहा लाख लोक अयोग्य असल्याने त्यांच्याकडून १५८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.