पुणे – पीएनजी ज्वेलर्स संदर्भात व्हायरल झालेला तो मेसेज बनावट असून यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार केली जाणार असल्याचे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ यांनी दिली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांमधील संभ्रमाचे वातावरण दूर होण्यात मदत होणार आहे.
गाडगीळ यांनी सांगितले आहे की, ‘लँडस्केप रिअॅलिटी’मध्ये ‘पीएनजी ज्वेलर्स’ गुंतवणूकदार किंवा भागीदार नाही. प्रसिद्ध झालेल्या डिमांड नोटीसमध्ये सौरभ गाडगीळ आणि राधिका गाडगीळ यांचे नाव कर्जदार म्हणून नव्हे तर, ‘लँडस्केप रिअॅलिटी’चे जामीनदार म्हणून नमूद आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’कडे बँकर्स, ऑडिटर्स, डायरेक्टर्स आणि व्यवस्थापनाची संपूर्णपणे वेगळी पथके आहेत. त्यामुळे त्याचा ‘लँडस्केप रिअॅलिटी’च्या कामकाजाशी काहीही संबंध नाही, असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आमचे नाव गुंतवणे आणि अफवा पसरवणे हा एकप्रकारे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आमचा व्यवसाय भक्कम असून ग्राहकांशी आमची बांधिलकी आहे. १८७ वर्षांची आमची परंपरा असून ग्राहकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. आम्ही दर्जेदार सेवा देण्यास सक्षम आहोत, असे गाडगीळ यांनी सांगितले आहे.