नाशिक – शहरातील एका गुन्हेगाराने पिस्तुलासह काडतुसे आपल्या नातेवाईकाच्या घरात लपवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. पोलीसांनी गावठी कट्टासह नऊ जिवंत काडतुसे हस्तगत केली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, सुरज विक्रम परदेशी (रा.रामानंद सोसा.बनारसी नगर हिरावाडी) असे आर्म अॅक्टखाली अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. शहरात गुन्हेगारांकडून शस्त्राचा वापर वाढल्याने पोलीसांनी मिशन शस्त्र जप्तीची मोहिम हाती घेतली आहे.त्यासाठी कोम्बीग आणि मिशन आॅल आऊटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रांसह अग्निशस्त्राचा साठा पोलीसांच्या हाती लागला आहे. यापार्श्वभूमिवर पोलीस ठाणे निहाय नियमीत गुन्हेगारांची झाडाझडती सुरू आहे.
पंचवटी पोलीसांनी विशेष मोहिमेत सुरज परदेशी या संशयीताच्या घराची झडती घेतली होती. मात्र हाती काही एक न लागल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ही घटना उघडकीस आली. संशयीताने हिरावडी परिसरातच राहणाºया एका नातेवाईकाच्या घरात एक गावठी कट्टासह नऊ जीवंत काडतुसे लपविल्याची माहिती दिल्याने या घटनेचा उलगडा झाला. पोलीसांनी नातेवाईकाचे घर गाठून तपासणी केली असता तेथे कट्यासह काडतुसे असा सुमारे ५३ हजार रूपये किमतीचे अग्निशस्त्र मिळून आले. याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत व अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पवार,पोलीस नाईक किरण सानप शिपाई नारायण गवळी,संदिप गाडे,विलास चारोस्कर,नितीन जगताप,राकेश शिंदे,कल्पेश जाधव व कुणाल पचलोरे आदींनी केली.