राष्ट्रवादीचा झेंडा : १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी
चाळीसगाव – तालुक्यातील पिलखोड ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलने बाजी मारत १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या १५ दिवसापासून सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू होती. यात चाळीसगाव तालुक्यात ७६ पैकी १० ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध
झाल्या. तर उर्वरीत ६६ ग्रामपंचायतीसाठी दि. १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले. त्यांचे निकाल लागले असून यात अनेक नवख्या उमेदवारांना संधी देत ग्रामस्थानी अनोखा कौल दिला आहे.
गिरणा काठावरील आणि नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव व नांदगाव सीमेवर असलेल्या पिलखोड ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे नव्हे तर जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत ग्रामविकास पॅनल व राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनल यांच्यात १३ जागांसाठी समोरासमोर लढत झाली. यात एकूण २६ उमेदवार रिंगणात उभे होते, यात परिवर्तन पॅनलने १३ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीत बहुमताने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे उमेदवार गोकुळ रामचंद्र बाविस्कर, गोरख गंगाधर बाविस्कर, मंगलाबाई सुनील बाविस्कर, अर्चना राजाराम मोरे, प्रकाश राघो यशोद, भीमराव झावराव यशोद, रत्ना दिलीप चौधरी, सुरेश नथू पाटील, रूपाली प्रशांत पाटील, पुष्पाताई आनंदा पाटील, संदीप संतोष मोरे, सुफीयाबी चांदखान पठाण, कविता राजेंद्र भील यांनी विजय मिळविला. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने परिवर्तनचे विजयी उमेदवार गावाच्या सर्वांगिन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे आश्वासन परिवर्तन पॅनलचे प्रमुख व विजयी उमेदवार गोकुळ बाविस्कर यांनी दिले आहे .