नाशिक – पिंप्री सदो ते – गोंदे या दरम्यान सहा पदरी महामार्ग व्हावा, यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते गोंदे या दरम्यानचा चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करुन हा महामार्ग सहा पदरी करण्याच्या कामाला आज सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ऑथरिटी ऑफ इंडिया) विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे समृद्धी महामार्ग ते गोंदे या दरम्यान वाहतुकीची होणारी कोंडी निकाली निघणार आहे. नाशिक-मुंबई या प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.
पिंप्रीसदो शिवारातून समृध्दी महामार्ग जात आहे. सध्या पिप्रीसदो ते गोंदे या दरम्यान चार पदरी महामार्ग आहे. मुंबईहून ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सहाजिकच वाहतुकीची मोठ्याप्रमाणावर कोंडी होत असल्याने प्रवाशांना इच्छूक स्थळी पोहण्यासाठी विलंब होत आहे. यातूनच प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. याची दखल घेत पिंप्री सदो ते – गोंदे या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरी करण व्हावे, यासाठी खा. गोडसे हे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील होते. याविषयी खा. गोडसे यांचा वेळोवेळी केंद्र शासनाच्या परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडे (नॅशनल ऑथरिटी ऑफ इंडिया) वेळोवेळी पाठपुरावा सुरु होता. आज अखेर खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले.
याबाबतचे पत्र परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे (नॅशनल ऑथरिटी ऑफ इंडिया) मुख्य जनरल मॅनेजर आशिष असाटी यांनी खा. गोडसे यांना दिले आहे. वडपे ते गोंदे दरम्यान सुमारे ९० किलोमीटरचा महामार्ग असून त्यापैकी पिंप्रीसदो ते गोंदे २० वीस किलोमीटरचा चार पदरी महामार्ग लवकरच सहा पदरी होणार आहे. याकामी सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिंप्री सदो ते गोंदे या दरम्यान सहापदरी महामार्ग लवकरच तयार होणार असून यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघणार असून नाशिक – मुंबई प्रवासाचा कालावधी निश्चितच कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी व्यक्त केला आहे.