पिंपळनेर – येथील कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक स्मार्ट फोन नसणा-या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या भागात जाऊन अॅाफलाईन शिक्षण देत आहे. शाळेच्या या उपक्रमाचे त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. हे शिक्षण देतांना शासनाच्या सर्व नियमांचे पालनही केले जात आहे.
धुळे येथील शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अॅानलाईन शिक्षण देण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे शाळेने पाचवी ते दहावी व ११ ते १२ वी अध्यापनाचे कार्य सुरू आहे. परंतु, ज्या पालकांची स्मार्ट फोन घेण्याची ऐपत नाही अशा पालकांच्या पाल्यांची गौरसोय होत होती. त्यामुळे विद्यालयातील शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतला. त्यानंतर विद्यार्थी राहतात त्याठिकाणी जाऊन तेथे विद्यार्थ्यांचे गट करुन अॅाफलाईन शिक्षण देणे सुरु केले.
सोशल डीस्टन्सिंग पाळून,सॅनेटाइझर व मास्कचा वापर करुन हे अध्यापनाचे काम सुरु आहे. पिंपळनेर मधील वडारवाडी, लोणेश्वरी, इंदिरानगर, घोड्यामाळ, जेबापूर रोड, नवापाडारोड, संजयनगर गजानन काॅलनी, गोपाल नगर ,पल्याड भिलाटी, भातोजी मंदीर परीसर तसेच पिंपळनेरच्या विविध भागात त्याचप्रमाणे पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील निरगुडीपाडा,धनखडी,हारपाडा,पखरू न,पारगाव, कुडाशी,शिव ,विजयपूर,पुण्याचापाडा,वार्सा, हारपाडा,टाकलीपाडा,रोहोड,टेंभे, आंबापाडा,नवापाडा अशा ठिकाणी जाऊन विद्यालयातील शिक्षकवर्ग जाऊन शिक्षणाचे धडे देत आहेत.या सर्व अॅफलाईन शिक्षण देणा-या शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन बाळासाहेब शिंदे,व्हा.चेअरमन दादासाहेब मराठे, शा.स.चेअरमन सुभाष शेठ जैन, काॅ.क.चेअरमन धनराजशेठ जैन, व.क.चेअरमन बापू साहेब गांगुर्डे यांनी कौतुक केले आहे.