पिंपळनेरचे भूमिपुत्र अभिनेता जितेंद्र बर्डे यांच्या प्रयत्नांना यश
अक्षय कोठावदे, पिंपळनेर
साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात मराठी चित्रपटाचे शुटींग सुरू झाले आहे. अभिनेता जितेंद्र बर्डे यांच्या पुढाकाराने हे शुटींग होत आहे. विशेष म्हणजे बर्डे हे पिंपळनेरचे भूमीपूत्र आहेत. या शुटींगच्या निमित्ताने पिंपळनेर परिसरातील अनेकांना संधी मिळाली आहे.
बर्डे यांचे शिक्षण एमए झाले असून त्यांना बालपणापासूनच अभिनयाची मोठी आवड आहे. याच छंदाचे पॅशन मध्ये रुपांतर करीत त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. २००६ मध्ये बर्डे यांनी पहिला चित्रपट नशिब प्रदर्शित केला. त्यास पिंपळनेरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बर्डे यांनी बंदीशाळा, शाली, कोती मराठी या चित्रपटात देखील आपली भूमिका बजावली आहे.
आता मोऱ्या या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी पुन्हा पिंपळनेरचीच निवड करण्यात आली असून त्यासाठीच्या ऑडिशनला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची शुटिंग पिंपळनेर परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक त्याचप्रमाणे आकर्षक ठिकाणी होणार आहे.
पिंपळनेर परिसरात संस्कृती, कला कशी जोपासली जाते याचे उत्तम सादरीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. या चित्रपटाद्वारे पिंपळनेर परिसरातील अनेक बाबींचे दर्शन यानिमित्ताने संपूर्ण जगाला होणार आहे.
‘मोऱ्या’ हा सिनेमा ग्रामीण भागातील वास्तवतेवर प्रकाशझोत टाकणारा मराठी चित्रपट पुढील वर्षी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील अधिकाधिक कलाकारांना संधी दिली जाणार असल्याचे लेखक व दिग्दर्शक बर्डे यांनी दिली आहे.
टोरटुगा मोशन पिक्चर्स निर्मित ‘मोऱ्या’ या सामाजिक विषयावरील मराठी चित्रपटाचे चित्रीकरण प्रत्यक्षात १६ एप्रिल पासून सुरू होणार असून ते सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी धुळे, पिंपळनेर, साक्री, सटाणा, मालेगाव या भागातील कलाकारांनी आपले कला-कौशल्य सादर केले.
या चित्रपटाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.
—
मी पिंपळनेरचा भूमिपुत्र असून माझ्या परिसरातील संस्कृती व कला या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हावी हाच माझा उद्देश आहे.
– जितेंद्र बर्डे, लेखक व दिग्दर्शक
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!