पिंपळनेर – येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर येथील तृतीय वर्ष पदार्थविज्ञान (फिजिक्स) या विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक पटकावण्याचा मान वैभवी अनिल शिंपी हिने मिळविला आहे. सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संपन्न झालेल्या परीक्षेमधून संपूर्ण विद्यापीठातून सर्वप्रथम येत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. वैभवीच्या यशामुळे पिंपळनेर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे मत प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे यांनी व्यक्त केले. तिच्या या यशासाठी पदार्थविज्ञान विभाग प्रमुख प्रा. (कै) एम. बी. एखंडे, प्रा. डॉ. एन. बी. सोनवणे, प्रा. व्ही. जी. उगलमुगले यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. आर. एन. शिंदे, उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र विनायकराव मराठे, कॉलेज कमिटी चेअरमन श्री. धनराज राजमल जैन, प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.