पिंपळनेर – येथील सामोडे चौफुलीजवळ पोलिसांनी चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरला पकडले असता त्यात ३० हजार रुपये किंमतीचे अंदाजे ६ ब्रॉस चोरटी वाळू मिळून आली. याप्रकरणी दोघां जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र रणधीर यांनी पिंपळनेर पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ८ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास चोरटी रेती वाहतूक करणारा डंपर सामोडे चौफुलीवर पकडण्यात आला. डंपर क्रमांक एम.एच .१८ बी.जी ४५८२ याच्यात अंदाजे ६ ब्रॉस वाळू आढळून आली. तिची किंमत अंदाजे ३० हजार रुपये लावण्यात आली तर ५ लाख रुपये किंमतीचा डंपर असा एकूण ५ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही चोरटी रेती वाहतुक दातर्ती गावाच्या शिवारातील पांझरा नदीच्या पात्रातून केली जात होती. याप्रकरणी संशयीत प्रशांत भिमराव पानपाटील ( वय २३ ) चालक रा.दिघावे ता.साक्री आणि भैय्या खैरनार ( पूर्ण नाव माहित नाही ) रा.मालपूर या दोघांविरुध्द पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर.बी.केदार करीत आहेत.