पिंपळनेर – धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मौजे करंजटी येथे नाबार्डच्या अर्थ सहाय्याने व लुपीन फाऊंडेशनद्वारे हवामान बदल अनुकूलन कार्यक्रम राबविला जात आहे. सदर प्रकल्पा अतंर्गत आज ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारचे रिसर्च फेलो विवेक शिंदे, लुपीन फाऊंडेशनचे अभियंता किशन देवरे, जीवशास्त्र तज्ज्ञ आकाश राठोड यांनी करंजटी येथे गावकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधला, प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेती विषयक प्रश्नांची माहिती घेतली. गाव पातळीवर आणि प्रत्यक्ष शेतीत पीक घेतांना पाणी वापराचा ताळेबंद म्हणजेच बजेट कसा असावा या विषयी मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात शाश्र्वत विकास साधताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रयत्न तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे हे अत्यंत महत्वाचे आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले. लुपीन सारखी संस्था ग्राम विकासाचे अभिनव काम करीत आहे ,लोक सहभागातून आणि लुपीन सारख्या संस्थेच्या माध्यमातून विकासाचे नवीन मॉडेल उभे राहत आहे.