पिंपळनेर – जल, जंगल, जमीन, जीव यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक पिढी मध्ये माणसावर बालपणापासून संस्कारांची गरज असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे यांनी केले. ते कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर यांच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित *पक्षी संवर्धन व पक्षी निरिक्षण कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पिंएसोचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षीतज्ञ अनिल रतिलाल माळी (नाशिक), तसेच प्रो. डॉ. एस. एस. पाटोळे (साक्री), प्रा. डॉ. एल. बी. पवार (साक्री), प्रा. डॉ. एस. डी. पगारे (सटाणा), प्रा. डॉ. जे. डी. वसाईत (मालेगाव), प्रा. डॉ. एच. आय. शेख (कुसुंबा), प्रा. डी. एस. पाटील (नंदूरबार), प्रा. जे. पी. अमृतकर (नाशिक) हे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सोनवणे पुढे म्हणाले की, सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्यप्राणी हा अत्यंत स्वार्थी आहे. स्वार्थापोटी तो निसर्गाला अक्षरक्ष: ओरबाडत आहे. ज्या निसर्ग देवतेमुळे माणसाची निमिर्ती व भरणपोषण होत असते त्याच्याशी तो बेईमान होऊन कृतघ्नपणे वागत आहे. निसर्गामध्ये पक्ष्यांचे महत्त्व हे अद्वितीय असून परागीभवनात, अन्नसाखळीत तर ते जीवो जीवस्य जीवनम् यावर आधारीत आहे असेही ते म्हणाले.अनिल माळी म्हणाले की, पक्षी निरीक्षण हा छंद आहे. तो चार भिंती मध्ये जोपासला जाऊ शकत नाही. त्यासाठी निसर्गात जावे लागते. पक्षी निरीक्षणासाठी संयम गरजेचा आहे. त्यातून माणसाची निरीक्षण क्षमता वृद्धिंगत होते. पक्षी निरीक्षणावेळी नैतिकता जोपासली पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष आर. एन. शिंदे म्हणाले की, पक्ष्यांच्या शिकारीस आळा घालणे, प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर,छपरावर कृत्रिम घरटी ठेवून त्यात पक्ष्यांसाठी धान्य ठेवावे, तसेच मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास त्यांची पाण्याची सोय होईल. या छोटया -खोटया गोष्टीतून त्यांचे संवर्धन होईल असे वाटते.
याप्रसंगी प्रो. डॉ. एस. एस. पाटोळे (साक्री) व प्रा. डी. एस. पाटील (नंदूरबार) यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व श्री. अनिल माळी यांचा परिचय प्रो. डॉ. बी. सी. मोरे यांनी करून दिला. संस्थेचे अध्यक्ष श्री. आर. एन. शिंदे यांचा परिचय प्रो. डॉ. आर. के. पेटारे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय खोडके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. वाय. एम. नांद्रे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यपकेतर कर्मचारी आणि साक्री, सटाणा, मालेगाव, कुसुंबा, नंदूरबार आणि पिंपळनेर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी ऑनलाईन जॉईन झाले होते.