पिंपळनेर, ता. साक्री – कासारे-मालपूर फाटा येथे मंगळवारी सायंकाळी दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार झाला असून या युवकाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पिंपळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रावसाहेब बोरसे (वय ३१) व त्यांची पत्नी पूनम बोरसे (वय २८) दोघेही रा. धाडणे ता.साक्री हे दोघेही साक्री येथून दुचाकीने (क्र. MH 18 AU 9059) धाडणे येथे जात होते. त्याचवेळी पिंपळनेर कडून साक्रीकडे ट्रक (क्र MH 18 BG 4755) जात होता. कासारे-मालपूर फाटा येथे ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात ज्ञानेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पूनम बोरसे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की कासारे-मालपूर फाट्यावरील पिकअप शेडचे देखील नुकसान झाले आहे. तर ट्रकच्या खाली अपघातग्रस्त दुचाकी आल्याने दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पंचनामा व गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू होते.
मनमिळाऊ स्वभाव
ज्ञानेश्वर बोरसे यांचा विवाह दीड महिन्यांपूर्वीच झाला होता. ज्ञानेश्वर अत्यंत गरीब व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या कुटुंबात ते एकमेव कर्ता पुरुष होते. ज्ञानेश्वर यांच्या निधनामुळे संपूर्ण धाडणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.