पिंपळनेर (ता. साक्री) – सूरतहून पिंपळनेर मार्गे मनमाडकडे जाणारा इथेनॉलचा टँकर चिंचपाडा फाटा येथे पलटी झाला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तेथे मदतकार्य सुरू करण्यात आले. धुळे आणि साक्री येथील अग्निशमन बंबांना येथे पाचारण करण्यात आले. अखेर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास टँकर बाजूला करण्यात येश आले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
पिंपळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलने भरलेला टँकर सूरतहून मनमाडकडे जात होता. दहिवेल-पिंपळनेर येथील चिंचपाडा फाटा येथे पलटी मंगळवारी (१ सप्टेंबर) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पलटी झाला. घटनेची माहिची मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पीएसआय भूषण हंडोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच, पलटी झालेला टँकरमधून इथेनॉल गळती होत होती. त्यावर नियंत्रण मिळविणे आणि कुठलीही जिवीतहानी होणार नाही, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. धुळे आणि साक्री येथील अग्निशमन बंबांनाही पाचारण करण्यात आले. दिवसभर हे काम सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. अखेर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास टँकर बाजूला करण्यात आला. वाहतुकीचा मार्ग सुरळीत करणे दिवसभर शक्य झाले नाही. पंचायत समिती सदस्य संगीता गावित यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी घटनेची पाहणी केली. सायंकाळी टँकर बाजूला करताच पोलीस कर्मचारी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्याचे काम करीत आहेत.