नाशिक – पिंपळगाव बहुला (सातपूर) येथील रहिवासी असलेल्या प्रथमेश मच्छिंद्र तिवडे (वय १८) या युवकाचा मखमलाबाद येथील पाण्याच्या पाटात बुडून मृत्यू झाला आहे. प्रथमेश हा मित्रांसमवेत आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाटात पोहण्यासाठी गेला होता. महात्मा फुले चौक, गंगावाडी शिवार, पंपिंग स्टेशन वॉटर सप्लाय, वनविभाग नर्सरी येथे तो पाण्यात पोहत असताना तो बुडाला. त्याच्या नाका, तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध झाला. ही बाब लक्षात घेऊन त्याचा मित्र कौस्तुभ गुलाबराव देवरे याने तातडीने प्रथमेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र, प्रथमेशची प्राणज्योत मालवल्याचे डॉ. राहूल पाटील यांनी घोषित केले. प्रथमेश हा बिटको कॉलेजमध्ये इयत्ता १२वीचे शिक्षण घेत होता. त्याच्या निधनामुळे पिंपळगाव बहुला गावात शोककळा पसरली आहे.