पिंपळगाव बसवंत – पिंपळगाव बसवंत शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. याबाबत तक्रार दाखल करूनही चोरट्यांचा छडा लागत नसल्याने पोलिसांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शुक्रवारी (दि. १८) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पिंपळगाव बसवंत बसस्थानकातून दुचाकी चोरी गेल्यानंतरही अद्याप चोरट्यांचा छडा लागलेला नाही.
याबाबत माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहन चोरीच्या घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाहन चोरीचे गुन्हे दाखल केल्यानंतरही चोरट्यांचा छडा लागत नाही. शुक्रवारी (दि. १८) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पिंपळगाव बसवंत बसस्थानकातून उभी केलेली निफाड तालुक्यातील उंबरखेड येथील प्रगतशील शेतकरी संतोष परशराम शिंदे यांची दुचाकी (क्र. एमएच-१५-सीडब्ल्यू-९५७१) चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर शिंदे यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तपास करीत आहे.