पिंपळगाव बसवंत – महिलांसाठी अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. शेती, उद्योग ,नोकरी, आदी क्षेत्रे काबीज करून स्त्रियांनी स्वतःला कर्तृत्वातून सिद्ध केले पाहिजे. हे करताना आरोग्य, करियर, समाज, अध्यात्म आणि कुटुंब या पंचसूत्रीचा योग्य समन्वय साधने आवश्यक आहे. उत्तम गृहिणी होणे हे सुद्धा जबाबदारीचे काम आहे. आदर्श गृहिणी संस्कारशील कुटुंब तयार करू शकते. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या सारखे आदर्श माता होता आले पाहिजे. असे मत जिल्हा परिषद सदस्या आर्किटेक्ट अमृता पवार यांनी व्यक्त केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या, यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वास मोरे, उल्हास मोरे, प्रा. रवींद्र मोरे, प्राचार्य डॉ दिलीप शिंदे, मविप्र क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील, अविनाश बनकर, उपप्राचार्य डॉ. सुनील आहिरे, उपप्राचार्य प्रा ज्ञानोबा ढगे, ज्युनियर कॉलेज इन्चार्ज प्रा दिलीप माळोदे ,प्रा. चित्ररेखा जोंधळे आदी उपस्थित होते.
अमृता पवार पुढे म्हणाल्या की, समाजात अपप्रवृत्ती वाढत चालली आहे. पण त्यांच्या विरुद्ध लढा करण्याची शक्ती विद्यार्थ्यांनीच्या अंगी असली पाहिजे. विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचे दाखले देत त्यांनी विद्यार्थीनीना न्यूनगंड झटकून टाकण्याचा सल्ला दिला. विद्यार्थिनीनी सामाजिक प्रश्नाचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत खेळाडू मुलींचा आणि प्राध्यापिका, कर्मचारी यांचा वृक्षभेट देऊन सन्मान करण्यात आला.प्राचार्य डॉ दिलीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली जाधव यांनी केले तर आभार प्रा.सम्राज्ञी मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.