पिंपळगाव बसवंत – कृषि विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी देशातील असंख्य संघटनांनी भारत बंदला पाठींबा दिला. अनेक ठिकाणी शांततेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निफाड तालुका सिटूच्या वतीने भारत बंदला पाठींबा देण्यात आला. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी हा काबाडकष्ट करून शेतमाल पिकवतो. मात्र, सरकार शेतक-यांच्या पाठीशी उभे राहत नाही. त्यातच सरकारने कृषि विधेयक आणून शेतक-याची थट्टाच केली आहे. हा बळीराजाचा अपमान असून, भारत बंदला सिटूचा जाहीर पाठींबा असल्याचे निवेदन निफाड तालुका सचिव बंडू बागूल यांनी पिंपळगाव पोलिसांना दिले. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी सदर निवेदन स्वीकारले. यावेळी प्रा. सचिन गाडेकर, सिटू तालुका सचिव कॉम्रेड बंडू बागुल, गणेश बोदाई, सचिन सूर्यवंशी, नितीन मोरे, विनोद गांगुर्डे, मंगेश सोनवणे, अनिकेत गांगुर्डे, संदीप मोकने, बालनाथ निकम, पूर्वा केमटेकचे सोपान मोगल, गणेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.