पिंपळगाव बसवंत: नववर्षाचा पहिला मराठी सण, अर्थात गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या, पाडवा सणाला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण, राज्यभर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहे. त्यामुळे या मुहूर्तावर शहरातील जवळपास २३ सराफ व्यावसायिकांची सोन्याची दुकाने बंद राहणार आहे.त्यामुळे साडे तीन मुहूर्ताच्या पाडव्या सणाच्या सोने खरेदीवर संक्रांत ओढवली आहे. शहर परिसरात सोने खरेदी ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद असल्याने पिंपळगावी जवळपास कोट्यवधींची उलाढाल ठप्प राहणार आहे.
पिंपळगाव शहरातील मेनरोडसह अन्य परिसरात सोने व्यवसायिकांची जवळपास २३ ते २४ दुकाने असून दरवर्षी पाडव्याच्या शुभ महूर्तावर जवळपास ३ ते ४ किलो सोन्याची विक्री होते. तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २ ते ३ किलोपर्यंत विक्री होत होती. मात्र यावेळेस ही विक्री होणार नाही.
नाशिक जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ म्हणून पिंपळगाव बसवंत शहराची ओळख सर्वदूर प्राप्त आहे.शहरात सोने खरेदीसह कपडे, शेती उपयोगी केमिकल औषधे पावडर, खरेदी करणाऱ्यासाठी बाहेरगावांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने कोरोना पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवसायिकांना जिल्हा प्रशासनाने व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत तर आहे. त्यात भाड्याचे दुकान असलेल्या व्यवसायिकांपुढे दुकान भाडे कसे भरावे हा प्रश्न उभा ठाकल्याने आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. शासनाने व्यवसायिकांना आर्थिक सहाय करावे अशी मागणी देखील सध्या व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.
कोट्यवधींचे नुकसान होणार
सध्या कोरोना पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने यंदाच्या गुढी पाडवा सणासह अक्षय तृतीयेच्या सणाची सोने खरेदी पूर्णपणे बंदच राहणार असल्याने व्यवसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.
स्थानिक सोने व्यावसायिक