पिंपळगाव बसवंत – पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २३) टोमॅटो उत्पादक शेतक-यास आडतदाराकडून झालेल्या मारहाणप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांनी निवेदन स्वीकारले.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव या शेतक-याला शुक्रवारी संत सावता माळी आडतमधील दोघांनी मारहाण केली. त्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. सोमवारी उंबरखेडचे माजी सरपंच भाऊ घुमरे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे, प्रकाश वाटपाडे, बेहेडचे माजी सरपंच अशोक घुटे, दावचवाडीचे माजी सरपंच योगेश कुयटे, पीडित शेतकरी जितेंद्र जाधव यांनी बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन दिले. या मारहाण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी (दि. २७) सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे बाजारे यांनी सांगितले. दरम्यान, बाजार समिती परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे अशोक घुटे यांनी लक्ष वेधले. त्यावर असे प्रकार आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे बाजारे यांनी सांगितले.
शेतकरी दारू पिला नसल्याचा खुलासा
मारहाण झालेल्या शेतक-याने मद्यपान केले असल्याचा आरोप आडत मालकाने केला होता. मात्र, संबंधित शेतक-याने मद्यपान केले नसल्याचा खुलासा बाजार समिती कर्मचारी दीपक गवळी यांनी केला.
….
कारवाई होणारच !
कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधितांवरकारवाई होणार असल्याचे बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांनी सांगितले.
…..
हे चुकीचेच…
शेतक-याला मारहाण करणे चुकीचे आहे. या प्रकरणाची शेतकरी संघटनेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालावे.
– अर्जुन बोराडे, नेते, शेतकरी संघटना
…..
…अन्यथा आंदोलन
टोमॅटो उत्पादक शेतक-यास मारहाण करणा-यावर बाजार समितीने कारवाई करावी. तसे न झाल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.
– प्रकाश वाटपाडे, सामाजिक कार्यकर्ते, पाचोरे वणी
…
अन्याय थांबवावा
शेतकर्यांना व्यापारी, आडतदारांकडून हीन वागणूक दिली जात असेल तर इतकी मोठी बाजार समिती काय कामाची? भविष्यात अशा घटना घडणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकर्यांवर होणारा अन्याय थांबवावा.
– देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ
……
सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात
शेतकर्यांच्या सण उत्सवाच्या दिवशी बाजार समिती बंद ठेवावी. तरच बाजार समिती शेतकर्यांच्या हितासाठी आहे, असे म्हणता येईल. तसेच शेतकर्यांच्या सुरक्षिततेसाठी बाजार समितीने उपाययोजना कराव्यात.
– भाऊ घुमरे, माजी सरपंच, उंबरखेड
……
अद्याप नाही मिळाले पैसे
शुक्रवारी टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर मला आडतदारांकडून मला मारहाण करण्यात आली. मात्र, तीन दिवस उलटूनही अद्याप आपल्याला आडतदाराने पैसे दिलेले नाहीत.
– जितेंद्र जाधव, पीडित शेतकरी, कारसूळ