पिंपळगाव बसवंत – शेतकरी हा आत्मनिर्भरच आहे, केवळ त्यास परावलंबी करण्याचा कट आहे, असा आरोप सिटूचे प्रा. सचिन गाडेकर यांनी केला. कृषि विधेयकाला विरोध म्हणून मंगळवारी सिटूच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाट्यावर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी गाडेकर बोलत होते.
गाडेकर म्हणाले, तीनही कृषी कायदे आणि विज विधेयक हे लोकशाही आणि शेतकरीविरोधी आहे. शेतकर्यांनी कधीच मागणी केली नव्हती आणि ती शेतकर्यांची गरज नाही. किमान उत्पादन मूल्य निश्चित आणि ते राबविणे एवढीच गरज होती. परंतु, मूलभूत गरज सोडून लूट करण्याचा निर्णय हिटलरशाही सरकारने घेतला आहे. कुठल्याही शेतकरी संघटनेला विश्वासात घेतले नाही, व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची खूली सूट या कायद्यात दिली आहे. जिओने आधी फुकट सेवा देत लोकांना सिमकार्ड घ्यायला लावले आणि नंतर त्यावर बिल आकारले. हेच माॅडेल या कायद्यामध्ये आहे. आधी लालूच नंतर लूट, म्हणून विरोध असा प्रकार सध्या सुरू असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप, रवीशंकर प्रसाद आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच अजेंडे, त्यांचेच धोरण पुढे नेल्याचा आरोप केला. यावरून हे स्पष्ट आहे की जनतेला जागे व्हावे लागणार आहे. पंजाबचे शेतकरी का एकत्र आले कारण पंजाबमध्ये काॅन्ट्रेक्ट फार्मिंग झाली आहे. तिथे शेतीची लूट शेतकर्यांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे. म्हणून शेतकर्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. मी गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच काम बंद ठेवले आहे. ‘शेती समृद्ध तर देश समृद्ध’ ही विचारधारा आपली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असून, केंद्र सरकारचा जाहीर निषेध प्रा. गाडेकर यांनी केला.