पिंपळगाव बसवंत – नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा द्राक्ष, डाळिंब, उस, भाजीपाला व धान्य पिकविणारा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात गेली पाच ते सात वर्षांपासून अस्मानी, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच मागीलवर्षी नवीन कोरोना रोगामुळे जगासह देशात थैमान घातल्याचे लक्षात येत आहे. महावितरण विभाग व महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या भवती धाडसत्र सुरु केले आहे. विजबिले भरा, अन्यथा आपल्या रोहित्र, विद्युतपंप व लाईट कट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने शेतकऱ्यांचे वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी येथील महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की, मागील वर्षाच्या संकटातून शेतकरी बाहेर येतोच तर यावर्षी अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्यांचे द्राक्ष, गहु, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज एकरी ३ लाख रुपये खर्च करुन निर्यातक्षम द्राक्ष पिकवायचे आणि ते १५ रूपये किलोने म्हणजेच मातीमोल विकण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
तसेच, सरकाने शेतकऱ्यासाठी ५० टक्के बिले भरून संपूर्ण वीज बिल माफीची आणलेली योजना कौतुकास्पद आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या गरजा व भावना लक्षात घेऊन या योजनेची अमंलबजवणी करायला पाहिजे. जेणेकरुन शेतकरी व महावितरणमध्ये संघर्ष होणार नाही. याचाही विचार सरकारने व महावितरणने करणे गरजेचे आहे. म्हणून सरकार व महावितरणला या निवेदनाद्वारे कळवू इच्छीत आहे. आपणाकडून सुरू असलेले धाडसत्र थांबवावे, अन्यथा शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था झुगारुन आपणाविरोधात रस्त्यावर यावे लागेल. तेव्हा रोहित्र आणि विद्युतपंप किंवा वीज कनेक्शन कट न करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनप्रसंगी देवेंद्र काजळे, कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ, मधुकर ताकाटे, रमेश गायकावाड, मनोज मोरे, निवृत्ती ताकाटे, गणपत जगताप, अशोक मेधणे, बाळासाहेब जाधव,जालिंदर बनकर, वैभव केणे आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे शेतकरी वर्ग त्रस्त
आसमानी संकटांनी व कोरोना वायरसमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे त्यात महावितरण विभाग व महाविकास आघाडी सरकारने जे धाडसत्र योजना सुरु केली आहे ती थांबवा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल. म्हणुन शेतकऱ्याच्या गरजा व भावना लक्षात घ्या. आणि शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा व कंपन्याकडुन १०० % वसुली करा..
देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते