पिंपळगाव बसवंत – पिंपळगाव बसवंत परिसरातील वीजपुरवठा काही दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. यामुळे शेतकरी, व्यापा-यांनी याप्रश्नी आमदार दिलीप बनकर यांची सोमवारी भेट घेतली. त्यानंतर बनकर यांनी महावितणच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. आठवडाभरात वीजप्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे यावेळी अधिका-यांनी सांगितले.
पिंपळगाव बसवंतची बाजारपेठ नाशिक जिल्ह्यातील मोठी आहे. याठिकाणी बाहेरगावाहून असंख्य नागरिक दररोज येतात. व्यावसायिकांची संख्या मोठी असून, औद्योगिक क्षेत्राचाही यात समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव बसवंत परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. या त्रासाला कंटाळून सोमवारी शेतकरी, व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने आमदार दिलीप बनकर यांची भेट घेतली.
बेंद मळा, पाचोरे शिव, पाचोरे फाटा व रानमळा या परिसराला एकाच फिडरमधून वीज पुरवठा करण्यात येतो. या अंतर्गत एकूण ५७ ट्रान्सफार्मर असून, लोडमुळे सतत वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे व्यावसायिक व शेतकरी वर्ग यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत तत्काळ महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी, सतत इंसुलेटर खराब होणे, लोंबणाऱ्या तारा, वाकलेले पोल, वायरमन पदाच्या रिक्त जागा आदींबाबत चर्चा करून येत्या शनिवारी कर्मचा-यांची मोठी कुमक लावून सर्वत्र एकाचवेळी तपासणी करण्यात येणार आहे. ज्यामुळे सतत वीज खंडित होण्याचे टाळले जाईल. या आठवड्यात रविवारपर्यंत सर्व अडचणी दूर करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतरही काही अडचण असल्यास ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन आमदार बनकर यांनी दिले.
पिंपळगाव बसवंत महावितरणचे मुख्य अभियंता एकनाथ कापसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विश्वासराव मोरे, दिलीप नाना मोरे, प्रा.रवींद्र मोरे, बाळासाहेब बनकर, शाम दिलीप मोरे, संजय दादा मोरे राजेंद्र खोडे, दिलीप दिघे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणने तत्काळ लक्ष घालावे
सध्या द्राक्षबागांच्या छाटण्या सुरू आहेत. त्यामुळे वेळोवेळी औषध फवारणी करणे, बागेला वेळेत पाणी देण्याची गरज असते. मात्र, वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतक-यांचे नियोजन बिघडत आहे. याप्रश्नी महावितरणने तत्काळ लक्ष घालावे.
– दिलीप मोरे, शेतकरी, रानमळा, पिंपळगाव बसवंत