पिंपळगाव बसवंत: कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आणि संशयित रुग्ण यांना सामान्य नागरिकांपासून वेगळे ठेवण्यासाठी खेड्यातील घरे लहान असतात म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेल्या आवाहनाला लोकसहभागातून कारसूळ येथे विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या “कोरोनामुक्त गाव अभियाना” अंतर्गत कक्ष सुरु झाल्याने कारसूळ, नारायण टेंभीसह परिसरातील लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विलगीकरण कक्षासाठी जिल्हा परिषद शाळांचा वापर करण्याच्या सुचना नुकत्याच शिक्षणाधिकारी, ग्रामसेवक यांना दिल्या. विशेष म्हणजे “कोरोनामुक्त गाव अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानात माझे गाव व परिसर “कोरोनामुक्त” झाला पाहिजे, या उद्देशाने कारसूळ ( ता. निफाड ) येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी सहभागी होत स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुसज्ज विलगीकरण कक्ष स्थापन केला. ५० पेक्षा जास्त रुग्णाचे विलगीकरण होऊ शकते. परंतु आज मितीस २० रुग्णाची सुविधा करण्यात आली असून महिला आणि पुरुष असे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. रुग्णासाठी स्वच्छातागृह, २४ तास लाईट, सनिटाईजर, डसबीन, टीव्ही, फॅन, गादी, उशी, आंघोळीसाठी सुविधायुक्त विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे.
रूग्णांची काळजी घेण्यासाठी पालखेड मिरचीचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. योगेश शिंदे, लोणवाडी आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देवरे, आरोग्य सेवक डॉ. मनोज पाटील,कारसूळचे ग्रामसेवक राजेंद्र वाघ, नारायण टेंभीचे ग्रामसेवक गणेश पगार, पोलीस पाटील रमेश ताकाटे, तलाठी सिध्दांत वाघमारे, आशा स्वयंसेविका वैशाली कंक, सविता सताळे आदी परिश्रम घेत आहे.
चांगला आदर्श निर्माण केला
कारसूळ येथील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करुन गोरगरिबासाठी चांगले काम केले तसेच चांगला आदर्श निर्माण केला आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच गावाची काळजी घ्यावी.
– लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक
…..
धावपळ व गैरसोय दूर केली
देवेंद्र काजळे यांनी कारसूळ जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करुन रुग्ण व आणि नातेवाईक यांची धावपळ व गैरसोय दूर केली आहे. इतर गावांनीही या निर्णयाचा आदर्श घेतला पाहिजे.
– अनिल कदम माजी आमदार निफाड,
…
काजळे यांनी स्वखर्चाने कक्ष स्थापन केला
देवेंद्र काजळे यांनी जिल्हा परिषद शाळेत माझे गाव “कोरोनामुक्त” गाव अभियाना अंतर्गत स्वखर्चाने कक्ष स्थापन केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. परिसरातील रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
– आशा ताकाटे, सरपंच, कारसूळ