पिंपळगाव बसवंत – कांदा साठवणुकीवर निर्बंध लादल्याने चार दिवसांपासून व्यापार्यांनी बंद ठेवलेले लिलाव शुक्रवारी (दि.३०) सुरू झाले. या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला ७१४० रूपये दर मिळाला. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला.
केंद्र सरकारने घाऊक व्यापा-यांना २५ टन, तर किरकोळ व्यापार्यांना २ टन कांदा साठवणुकीची मर्यादा लादल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी सोमवारपासून लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. लिलाव बंदमुळे चार दिवसांत शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (दि. २७) सभापती दिलीप बनकर यांनी बैठक घेत व्यापारी वर्गाला लिलाव सुरू करण्याचे आवाहन केले होते. मात्र, व्यापा-यांनी त्यास नकार दिल्याने बैठक निष्फळ ठरली. बुधवारी (दि. २८) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी देखील नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांना लिलाव सुरू करण्याचे आवाहन केले होते. गुरूवारी (दि. २९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर कांदा व्यापा-यांची बैठक बोलावली होती. यावेळी शेतकरी हितासाठी व्यापा-यांनी लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापा-यांनी लिलावात सहभागी होण्यास संमती दर्शवली. त्यामुळे शुक्रवारपासून कांदा लिलाव सुरू झाले.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त ७१४० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे शेतक-यांना काहीसा दिलासा मिळाला.
उन्हाळ कांद्याचे दर
– कांदा : कमीत कमी-२५००, जास्तीत जास्त-७१४०, सरासरी-५८००.
– गोल्टी :कमीत कमी ४१०१, जास्तीत जास्त- ५१५५, सरासरी-५०००.
– खाद : कमीत कमी-१०००,जास्तीत जास्त-३५००, सरासरी-२७५१.
लाल कांद्याचे दर
– कांदा : क. कमी-२०००, जा. जास्त-३९०१, सरासरी-३६०१.
– गोल्टी : क. कमी-७००, जा. जास्त २५००, सरासरी-२०००.