पिंपळगाव बसवंत: कोविड १९ विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड १९ लसीकरण सुरू आहे. मात्र पिंपळगाव बसवंत हे व्यापारी शहर असल्याने पंचक्रोशीतील १० गावे व ५ उपकेंद्रांचा समावेश होत असल्याने गावची लोकसंख्या पहाता कोविड १९ लसीचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने पिंपळगाव बसवंत शहरासाठी कोविड १९ लसीचा अतिरिक्त पुरवठा करावा अशी मागणी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या सरपंच अलका बनकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, निफाड तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तालुक्यातील बहुचर्चित व व्यापारी दृष्ट्या मोठे शहर म्हणून पिंपळगाव बसवंत शहराची ओळख आहे. शहरात कोविड १९पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र पंचक्रोशीतील गावांची संख्या व ५उपकेंद्रांची संख्या बघता कोविड लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आरोग्य विभागासह प्रशानाने पिंपळगाव बसवंत शहरासाठी वाढीव लसीकरचा पुरवठा करण्याची मागणी सरपंच अलका बनकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.