पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात मार्च महिन्याच्या प्रारंभीपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरात बुधवार .७ एप्रिलपासून ते ११ एप्रिल पर्यंत मेडिकल, हॉस्पिटलची अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसाचा कडकडतीत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने रविवारी घेतला आहे.
शहरात कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण व उपाययोजनासाठी शहरातील अग्निशामक विभाग कार्यालयात ग्रामपालिका प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशास व स्थानिक व्यापारी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ग्रामपालिका सरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, मंडळअधिकारी नीलकंठ उगले, किरण लभडे, अल्पेश पारख, बापू कडाळे, सुरेश गायकवाड, बाळा बनकर, दीपक विधाते, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदीसह शहर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपालिका, महसूल, पोलीस प्रशासनासह स्थानिक व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पिंपळगाव शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याबाबत व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. व्यापारी वर्गाने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नो मास्क, नो एन्ट्री, फिजिकल डिस्टनसिसह कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या. शिवाय सर्वानुमते झालेल्या चर्चेअंती शहरात बुधवार पासून ते रविवार पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ५ दिवसाचा जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्युच्या निर्णयास सर्व व्यापाऱ्यांनी एकमत दर्शविल्याने बंद काळात पिंपळगावकरांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने यावेळी केले.
पिंपळगावकरांना आवाहन
पिंपळगाव बसवंत शहरातील ग्रामस्थ नागरिक यांनी कोरोना विषाणूपासून बचावासाठी व खबरदारी म्हणून मेडिकल व हॉस्पिटलची अत्यावश्यक सेवा वगळता ११ एप्रिलपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीसह पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले असून नियम मोडणाऱ्या व्यवसायिकांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.