पिंपळगाव बसवंत – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उत्सव साधेपणाने साजरे झाले. नवरात्रोत्सव देखील त्यास अपवाद नाही. अशा परिस्थितीत येथील अवलियाने आपल्या फोटोग्राफीतून नवदुर्गांना अनोखा सलाम दिला आहे. दररोजच्या नवदुर्गाचे फोटो पिंपळगाव बसवंत येथील छायाचित्रकार संकेत शेटे यांनी काढले. शुक्रवारी त्याने महिला फोटो काढत त्यांच्या कार्याचे दर्शन नागरिकांना करून दिले. “कोरोना काळातील नवदुर्गा” म्हणून रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलीस भगिनींनी ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे ब्रीदवाक्य मनाशी ठेऊन सदैव आपले कर्तव्य बजावत असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले.
फोटोग्राफीतून काहीसे वेगळे करण्याचा प्रयत्न
वडिलांनी ४६ वर्ष फोटोग्राफीचा व्यवसाय केला. त्यांच्याकडूनच मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असताना फोटोग्राफीतून काहीसे वेगळे करून दाखविण्याचे ठरवले. त्यात मला यश आले.
– संकेत शेटे-पाटील, संचालक, चित्रगंधा फोटो स्टुडिओ, पिंपळगाव बसवंत