पिंपळगाव बसवंत – वर्षानुवर्षापासून सडत पडलेली पोलीस ठाण्याच्या आवारातील जुनी वाहने २० दिवसांत नष्ट करण्याचे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी येथील अधिकार्यांना दिल्या. शनिवारी (दि. २८) पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत डाॅ. दिघावकर यांनी विविध विषयांवर पोलीस अधिका-यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी शनिवारी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतक-यांच्या झालेल्या फसवणुकीच्या तक्रार अर्जांची माहिती जाणून घेतली. सुशिक्षित बेरोजगारांची झालेली फसवणूक, पिंपळगाव परिसरातील विविध गुन्हे किती मार्गी लागले याबाबत डाॅ. दिघावकर यांनी पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना विचारणा केली. तसेच पोलीस ठाणे आवारात अनेक वर्षांपासून सडत पडलेली जुनी वाहने २० दिवसांत नष्ट करण्याचे निर्देश दिले. पोलीस ठाणे आवारात स्वच्छता करण्याच्या सूचनाही दिघावकर यांनी दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाडचे पोलीस उपाधिक्षक सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक रंगराव सानप, ओझरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पिंपळगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक पाटील, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सायखेडा पोलीस निरीक्षक आशीष आडसूळ, वडनेर भैरवचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांकडून दिघावकरांचा सत्कार
अनेक वर्षांपासून शेेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करुन पलायन करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकविण्याचे डॉ. प्रताप दिघावकरांनी चांगलेच मनावर घेतले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळत आहे. शनिवारी दिघावकर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आले असता कारसूळ, पिंपळगाव बसवंत, मुखेड, बेहेड येथील शेतकऱ्यांनी डॉ. दिघावकर यांचा सत्कार केला. नव्याने द्राक्षबागांचा हंगाम सुरु होतोय. यावर आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती करावी, जेणेकरुन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन देखील दिघावकर यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे, उद्धव शिंदे, संजय मिंधे, सतीश बनकर, संतोष वराडे, सुरेश हेमाले, मनोज मोरे, लहु गवळी, सतीश आरगडे, परशराम पवार, सुरेश साळुंके, अशोक बनकर, सुभाष विधाते, रमेश गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.