पिंपळगाव बसवंत : एकदा जबाबदारी अंगावर पडली की वेड्यालाही शहाणपण येते, असे म्हटले जाते. त्यात कष्टकरी महिलेवर अचानक कुटुंबाची जबाबदारी पडल्यावर “कोळशातूनही हिरा चकाकतोच”… अशीच परिस्थिती निफाड तालुक्यातील कारसूळ येथील कल्पना वसंत शंखपाळ यांच्यावर ओढवली. २००९ साली पतीला अचानक अंधत्व आल्यानंतर कुठल्याही संकटाला न डगमगता या नवदुर्गेने आपल्या “कल्पनेतून” “वसंता”चा मळा फुलविला.
कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकरी वसंत पुंडलिक शंखपाळ यांची चार एकर बागायती शेती आहे. याच शेतीवर पुर्वापार शंखपाळ कुटुंबाची गुजराण अनेक वर्षांपासून सुरू आहे. छोटे कुटुंब असूनही केवळ परिश्रमाच्या बळावर सर्व काही ठिकठाक सुरू होते. पत्नी कल्पना या देखील पतीला शेती कामात हातभार लावत होत्याच. मात्र, नियतीला या कुटुंबाचा सुखी संसार मान्य नव्हता की काय, पण वसंत शंखपाळ यांना २००९ साली अचानक अंधत्व आले. यामुळे पत्नी कल्पना यांच्या पायाखालची वाळूच सरकली. स्वतंत्र कुटूंब आणि लहानगा एकुलता एक मुलगा असल्याने कल्पना यांच्या खांद्यावर पती, मुलासह चार एकर शेतीची जबाबदारी पडली. या संकटाला न डगमगता या नवदुर्गेने “कल्पनेतून” आपल्या “वसंता”चा मळा फुलविण्याचे स्वप्न उरी बाळगले. त्यातच मुलगा आदित्य आठ वर्षांचा… आपल्या भविष्यातील उगवत्या तार्याला चमकविण्यासाठी काळ्या आईची सेवा करण्यास कल्पना यांनी सुरुवात केली. दोन एकरमध्ये द्राक्षबागेची लागवड केली. तर, उर्वरित शेतात, हंगामी मका, सोयीबिण, भाजीपाला ही पिके घेण्यास सुरुवात केली. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. याच शेतीच्या उत्पन्नातून मुलगा आदित्यचे बारावी विज्ञान शाखेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. द्राक्षबागेवर कल्पना याच औषध फवारणी करतात. मुलगा आदित्य हा देखील आईला शेती कामात मदत करतो. आदित्यला पुढे बीएससी नर्सिंगचे शिक्षण घ्यायचे आहे.
कष्टातून मिळालेल्या फळाचे समाधान
पतीला आलेल्या अकाली अंधत्वानंतर शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली. परंतु, त्यास न डगमगता मी शेती करण्यास सुरूवात केली आहे. कष्टातून मिळालेल्या फळाचे मला समाधान आहे.
– कल्पना वसंत शंखपाळ, शेतकरी, कारसूळ (ता. निफाड)