पिंपळगाव बसवंत: द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील पालखेड मिरची, दावचवाडी शिवारात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना तडाखा दिला. जोरदार झालेल्या गारांच्या तडाख्यात काढणीस आलेल्या द्राक्षबागांना फटका बसला.तर कुठे गव्हसह अन्य पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्याने नागरिक गर्मीपासून हैराण झाले होते. मात्र शनिवार सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होत दुपारी अवकाळी पावसाने पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरातील गावात विजेच्या जोरदार कडकडाट व गारांसह हजेरी लावल्याने काढणी सुरू असलेल्या द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. तर रविवारी पुन्हा पिंपळगाव शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली शिवाय परिसरातील पालखेड मिरची, दावचवाडी शिवारात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह गारांच्या तडख्यात द्राक्ष पिकांसह गव्हाच्या पिकाचे नुकसान केल्याने आधी कोरोना त्यात अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
तातडीने मदत जाहीर करावी
आधीच कोरोनाने द्राक्ष उत्पादकांचे हाल केले त्यात अवकाळी पाऊस व गारांच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रशासनाने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे सरसगट पंचनामे जाहीर करत तातडीने मदत जाहीर करावी
शुभम वेरुळे, द्राक्ष उत्पादक