पिंपळगाव बसवंत – येथील बाजार समितीमध्ये बुधवारी कांदा दरात ७०० रुपयांची घसरण झाली. क्विंटलमागे ५६०१ रूपये भाव मिळाल्याने शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी हाच दर ७२०५ वर स्थिरावला होता. तर, मंगळवारी ६३०० रूपयांचा दर मिळाला. परदेशी कांदा मुंबईत दाखल होताच कांद्याची घसरगुंडी पहायला मिळाली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतक-याचे दिवाळे निघणार आहे.
केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध लादल्याने मागील आठवड्यात चार दिवस व्यापा-यांनी लिलाव बंद ठेवले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.३०) लिलाव पुर्ववत सुरू होताच उन्हाळ कांद्याला ७१४० रूपये दर मिळाला. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला. सोमवारी ७२०५ रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. मंगळवारी उन्हाळ कांद्याला ६३०० रुपये दर मिळाला. मागील चार दिवसांच्या तुलनेत कांदा दरात ९०० रूपयांची घसरण झाल्याने शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली. होती. बुधवारी कांद्याला ५६०१ रूपयांचा दर मिळाल्याने शेतक-यांचे दिवाळे निघणार आहे.
….
कंबरडे मोडणार
आठ दिवसांपूर्वी कांदा आठ हजार रुपये क्विंटल असताना आता जवळपास निम्म्यावर दर घसरले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्यांचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
– भाऊराव ठोंबरे, कांदा उत्पादक, भोयेगाव (ता. चांदवड)
बुधवारचे उन्हाळ कांद्याचे दर
– कांदा : क. कमी-२०००, जा. जास्त-५६०१, सरासरी-३७५१.
– गोल्टी : क. कमी-१५००, जा. जास्त-३४०२, सरासरी-३०००.
– खाद : क.कमी-५००, जा. जास्त-३२००, सरासरी-२५००.
लाल कांद्याचे दर
– कांदा : क. कमी-१५००, जा. जास्त-५४५२, सरासरी-३५००.
– गोल्टी : क. कमी-५००, जा. जास्त २९०१, सरासरी-२५००.