पिंपळगाव बसवंत – तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयातीला पायघड्या घातल्या. देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला. त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याने तुर्कस्थानच्या कांद्याने राज्यातील कांदा उत्पादकांचा घात केला आहे. कांद्याला उग्रवास असल्याने तुर्कीचा कांदा चवीला मात्र वांधा आहे.
महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यासह देशातील बेंगलोर, इंदोर येथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. पावसाने लाल कांद्याच्या पिकाची दाणादाण उडवून दिल्याने मोठी नासाडी झाली. लाल कांद्याचे आगमन लांबल्याने मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढली व कांद्याचे दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले. कांद्याच्या तेजीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र शासनाने अपशकून केला. थेट तुर्की, इजिप्तच्या कांद्याच्या आयातीसाठी रेड कार्पेट टाकले.
तुर्कस्थानचा कांदा शनिवारी पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे बाजार घसरण दिसली. गतवर्षी हा कांदा भारतात आला होता. पण उग्र वास, बेचव होता. चवीत वांधा असल्याने तुर्कीच्या कांदयाकडे नागरिक पाठ फिरवतील असे दिसते. पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी तुर्कीच्या कांद्याला सरासरी दीड हजार रूपये तर स्थानिक कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपये प्रतीक्विंटल दर मिळाला. तुर्कीचा कांदा दरावर दबाव आणत असल्याने शेतक-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आजचे दर
उन्हाळ कांदा
– कांदा : क. कमी-१९००, जा. जास्त-५७००, सरासरी-४२५१.
– गोल्टी : क. कमी-१०००, जा. जास्त-३४९०, सरासरी-३२००.
– खाद : क.कमी-५००, जा. जास्त-२४०१, सरासरी-१७०१.
लाल कांद्याचे दर
– कांदा : क. कमी-२००१, जा. जास्त-५५००, सरासरी-४३०१.
– गोल्टी : क. कमी-५००, जा. जास्त २९२०, सरासरी-२५५१.